रत्नागिरी – नागपूर येथे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर चौकशीपूर्व कारवाई न करता थेट अटक केल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने आज, शुक्रवार ८ ऑगस्टपासून राज्यभर सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये ठप्प झाली आहेत. अधिकाऱ्यांच्या या आंदोलनाला इतर संघटनांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, सोमवारपासून आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांना यापूर्वीच निवेदन पाठवून सत्ताधाऱ्यांकडून शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीचा निषेध नोंदवला आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर येथील शिक्षण विभागातील उपसंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना विनाचौकशी अटक करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील वर्ग एक आणि वर्ग दोनचे सुमारे शंभर अधिकारी शिक्षण संचालकांसह पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर दिवसभर आंदोलन करत होते. जिल्हास्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन आंदोलन सुरू करण्यात आले.
या आंदोलनाद्वारे नागपूर येथील घटनेची चौकशी करून निर्दोष अधिकाऱ्यांची तात्काळ मुक्तता करण्याची, भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यापूर्वी चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याची, तसेच शिक्षण प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शासनाने स्पष्ट दिशा-निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना संघटनेचे अध्यक्ष शेषराव बडे यांनी, “अधिकारी शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करत असताना झालेल्या त्रुटींवर योग्य चौकशीऐवजी थेट गुन्हे नोंदवणे आणि अटक करणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे म्हटले आहे. विभागाच्या इतिहासात अधिकाऱ्यांना अशा प्रकारे राज्यव्यापी आंदोलन करण्याची वेळ पहिल्यांदाच आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.