ग्रामस्थांचा जीव धोक्यात; नवी इमारत अजूनही अपूर्ण, कर्मचारीही अपुरे
फुणगुस / इकबाल पटेल: फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्राची कहाणी ही प्रशासनाच्या दुर्लक्षाची जिवंत साक्ष देणारी ठरली आहे. तीन वर्षांपूर्वी पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले. जुन्या इमारतीला पाडून त्याच ठिकाणी भव्य, आधुनिक आरोग्य केंद्र उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण आज तीन वर्षे उलटली तरी नवीन इमारतीचे काम अद्याप अपूर्णच आहे.
कामकाज बंद पडू नये म्हणून रुग्णसेवा तात्पुरत्या स्वरूपात जवळच असलेल्या स्टाफ क्वार्टर्समध्ये हलवण्यात आली. मात्र ती इमारत सुद्धा आता मोडकळीस आली आहे. भिंतींना तडे, छत गळकं… तरीही त्याच ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहेत. “जुनी इमारत पाडली, नवी अजून झाली नाही, क्वार्टर्सही पडायला आले आहेत… मग आमच्या आरोग्याची काळजी घेणारे नक्की कोण?” असा सवाल थेट प्रश्न सध्या ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पावसाळ्यात सर्पदंश व विंचूदंशाच्या घटना सतत होत असतात. अशावेळी तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. पण कर्मचाऱ्यांच्या अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे गरीब शेतकरी व सर्वसामान्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
सर्वात गंभीर म्हणजे, ही इमारत वापरणे धोकादायक असल्याचे प्रशासनाला माहीत असताना सुद्धा रुग्णांना त्याच इमारतीत उपचार घ्यावे लागत आहे. “उद्या काही दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण?” असा जळजळीत प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे.
गावातील अनेक समाज कार्यकर्त्यांकडू पाठपुरावा केला जात असताना सुद्धा प्रशासनाकडून अजून काहीही हालचाल केली जात नाही.गावातील लोकांचा संयम आता सुटत चालला आहे. नवी इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे व रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी भरावीत, अन्यथा एखादी वाईट घटना घडल्यास सर्वतोपरी प्रशासनच जबाबदार असेल असा थेट इशारा ग्रामस्थांकडून दिला जात आहे.
उद्घाटनाला तीन वर्षे पूर्ण… तरीही फुणगुस आरोग्य केंद्र मोडकळीस आलेल्या इमारतीतच!
