लांजा : मुथूट फायनान्स लिमिटेडच्या लांजा शाखेत २४ जून २०२४ ते ५ मे २०२५ दरम्यान २६.८१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुथूट फायनान्स कंपनीच्या लांजा शाखेतील पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात शाखा व्यवस्थापकाचाही समावेश आहे. या प्रकरणी संजय चुडाजी राऊळ (वय ४४) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे कंपनीचे क्लस्टर मॅनेजर आहेत, तर आरोपी हे लांजा शाखेचे कर्मचारी आहेत.
आरोपींनी संगनमताने बँकेच्या खातेदारांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये फेरफार केला आणि सोने बदलून एकूण २७३.७ ग्रॅम सोन्याचा अपहार केला, ज्याची किंमत २३,९६,००० रुपये आहे. याशिवाय, त्यांनी कंपनीची परवानगी न घेता साक्षीदार कांता कमलाकर कुरुप यांना त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात २,८५,००० रुपये दिले. या सर्व गैरव्यवहारामुळे कंपनीची एकूण २६,८१,००० रुपयांची फसवणूक झाली. या गुन्ह्याखाली भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ४१६(१), ४१८(४), आणि ४२१(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: सुनील तुकाराम गुरव (वय ५४, शाखा व्यवस्थापक), प्रसाद सीताराम रामाणे (वय २८, ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह), सुशांत सुनील धाडवे (वय २७, रोखपाल आणि ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह), ओंकार दिवाकर थारळी (वय २६, ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह), आणि तुषार गजानन वाडेकर (वय २७, ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह).
लांजात मुथूट फायनान्स कंपनीत 27 लाखांची फसवणूक; व्यवस्थापकासह 5 जणांवर गुन्हा
