रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोकाट गुरांचा मोठा वावर सुरू असून त्यामुळे प्रवाशांना उपद्रव होत आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाला विमानतळाची अनुभूती यावी, यासाठी नव्याने बांधकाम करण्यात आले आहे.
दिमाखदारपणे उभ्या राहिलेल्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना होणारा त्रास कमी झालेला नाही. नव्याने उभारण्यात आलेल्या छताची गळती सुरूच असून मोकाट गुरांनी रेल्वे स्थानकात निवारा केला आहे. जिकडे-तिकडे पडलेल्या शेणामुळे दुर्गंधीही येत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे.
रत्नागिरी हे कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. एक्स्प्रेस, सुपरफास्ट आदी सर्वच गाड्या या रेल्वेस्थानकावर थांबत असतात. पर्यटकही रेल्वे मार्गानेच कोकणात येत असतात. हाच विचार करून रत्नागिरी रेल्वे स्थानक अद्ययावत करणे व सुशोभित करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच या रेल्वे स्थानकाच्या नव्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात या रेल्वे स्थानकाच्या कामाची दुर्दशा समोर आली आहे. तसेच मोकाट गुरांनीही रेल्वे स्थानकावर आसरा घेतला आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
रत्नागिरी सुशोभित रेल्वे स्थानक परिसरात मोकाट गुरांचा उपद्रव

Leave a Comment