GRAMIN SEARCH BANNER

नागरी संरक्षण दल, रत्नागिरी मार्फत नाटे येथे ७ दिवसीय क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण यशस्वी संपन्न

Gramin Varta
332 Views

राजन लाड/राजापूर: महाराष्ट्र शासन गृह विभाग (विशेष) अंतर्गत कार्यरत नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे ७ दिवसीय क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण नाटे हायस्कूल (ता. राजापूर) येथे नुकतेच यशस्वीपणे संपन्न झाले. या प्रशिक्षणातून आपत्कालीन परिस्थितीसाठी तत्पर आणि प्रशिक्षित नागरी संरक्षण पथक तयार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आपत्ती व्यवस्थापन, नागरिकांमध्ये सजगता निर्माण करणे, प्रभावी बचावकार्य कौशल्ये विकसित करणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे हा होता. जिल्हा उपनियंत्रक अधिकारी, निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे सर्व सत्रे अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. सहाय्यक उपनियंत्रक श्री. आननसिंग गढरी आणि मास्टर ट्रेनर श्री. अक्षय जाधव यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली.

या सात दिवसीय प्रशिक्षणामध्ये एकूण ३० प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, प्राथमिक उपचार, पूरस्थितीतील बचावकार्य, भूकंप व आगप्रसंगी नागरिकांचे संरक्षण, तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य संपर्क व संप्रेषण या महत्त्वाच्या विषयांवर सखोल सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीचा अनुभव मिळावा यासाठी बचाव साधनांचा वापर, धूर व आग नियंत्रण, तसेच स्ट्रेचरच्या मदतीने जखमी व्यक्तींचे सुरक्षित स्थलांतर यांसारखी थेट प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. संदीप बांदकर, तसेच नाटे विद्या मंदिर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांचे विशेष सहकार्य लाभले. स्थानिक प्रशासन, महाविद्यालयीन कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग या शिबिराचे एक लक्षणीय वैशिष्ट्य ठरला.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. विश्वास करगुटकर, मांजरेकर सर, नाटे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि इतर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करताना, अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, धैर्य आणि कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याची सज्जता विकसित होते, असे मत व्यक्त केले. या शिबिरामुळे नाटे परिसरात नागरी संरक्षण दलाच्या कार्याबद्दल जनजागृती वाढली असून, आपत्तीप्रसंगी नागरिकांची सुरक्षा व तत्पर प्रतिसाद देण्याची क्षमता निश्चितच वृद्धिंगत झाली आहे.

Total Visitor Counter

3150544
Share This Article