दापोली: दाभोळ येथे एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किशोर येलवे (वय ४६) असे या नराधम शिक्षकाचे नाव असून, तो दाभोळजवळील अगरवांगणी येथे राहणारा आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना दाभोळमधील भंडारवाडा येथे दुपारी ४ ते ५ च्या सुमारास घडली. पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना, शिक्षक किशोर येलवे याने तिला घरी सोडण्याची तयारी दर्शवली. मुलीच्या घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन एलवेने तिच्यावर अतिप्रसंग केला. इतकेच नव्हे, तर त्याने हा प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकीही दिली.
या घटनेने घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला, त्यानंतर ही माहिती तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे, या शिक्षकाने यापूर्वीही मुलीला घरी सोडल्याचे समोर आले आहे.
या गंभीर प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ दाभोळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षक किशोर येलवे याला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १० तसेच बीएनए ७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला दापोली येथे नेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.