राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेला लुटण्यात आलेल्या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचे स्केच तयार करण्यात आले असून तपासाची चक्रे फिरू लागली आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.
ही धक्कादायक घटना दसऱ्याच्या दिवशी घडली. रश्मी प्रभाकर चव्हाण या कोदवली-तरळवाडी येथून सायंकाळी महामार्गावरील कोदवली थांब्यावर उभ्या होत्या. त्यांनी एका मोटारीला लिफ्टसाठी हात दाखवला असता, मोटारचालकाने त्यांना वाहनात घेतले. काही अंतर गेल्यानंतर पेडणेकर होम स्टॉपजवळील वळणावर संशयिताने अचानक त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला.
या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाल्या असून, संशयिताने त्यांच्याकडील रोकड, सोन्याची बुगडी आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याने चव्हाण यांना चालत्या गाडीतून रस्त्यावर ढकलून पलायन केले.
घटनेनंतर राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके कार्यरत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अपरिचितांकडून लिफ्ट न घेण्याचे आवाहन केले आहे.
राजापूर : लिफ्टच्या बहाण्याने महिलेला लुटणाऱ्या संशयिताचे स्केच तयार, पोलिसांकडून शोध सुरूच
