GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: अलोरे शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई; १४ हजारांचा गांजा जप्त, एकास अटक

Gramin Search
10 Views

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अलोरे शिरगाव पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, अलोरे शिरगाव पोलिसांनी पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी येथे छापा टाकून एका व्यक्तीस १४ हजार रुपयांच्या गांजासह अटक केली आहे.

२७ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ एक पथक तयार केले. दोन पंचांच्या उपस्थितीत सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान, संजय राया खरात (वय ३९, रा. पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी, ता. चिपळूण) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५८८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे १४ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात संजय खरात याच्याविरोधात गुन्हा रजि. नं. ४६/२०२५ अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर आळा बसण्यास मदत होणार आहे.

Total Visitor Counter

2650581
Share This Article