GRAMIN SEARCH BANNER

खेडच्या प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील रुजू: प्रशासकीय कामांना गती देण्यावर भर देणार

खेड: खेडच्या प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी खेडचे प्रांताधिकारी असलेले शिवाजी जगताप यांची सांगली येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. वैशाली पाटील या धाराशिव जिल्ह्यातील भूमच्या उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

वैशाली पाटील यांनी यापूर्वी दापोली येथे तहसीलदार म्हणून अत्यंत उत्तमरीत्या सेवा बजावली आहे. दापोलीतील त्यांच्या कामगिरीनंतर त्यांना पदोन्नती मिळाली होती. आता खेडच्या प्रांताधिकारीपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्रशासकीय कामांना गती देत, जनतेच्या समस्या मार्गी लावण्यावर आपला भर राहील.” त्यांच्या नियुक्तीमुळे खेडमधील प्रशासकीय कामकाजाला अधिक वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नूतन प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शिवसेना उपनेते संजय कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख कुंदन सातपुते, अंकुश वारे, प्रेमळ शिखले, राजेश संसारे, केतन आंब्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor

0224562
Share This Article