राजापूर: केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राजापूर तालुक्यातील ५० गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित झाली असली, तरी उर्वरित सुमारे १५० गावे अद्यापही या योजनेच्या पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत आहेत. योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असले तरी, निधीअभावी या कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे.
प्रत्येक घरात नळजोडणीद्वारे स्वच्छ आणि मुबलक पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. सुरुवातीला सप्टेंबर २०२४ ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती; मात्र कामांचा वेग लक्षात घेता आता ही मुदत वाढवून मार्च २०२८ करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्याने नियोजन करून कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
राजापूर तालुक्यातील सुमारे २०० महसुली गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. यासाठी शासनाने ११२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सध्या बहुसंख्य गावांमध्ये पाइपलाइन टाकणे, जलसाठा टाक्या उभारणे आणि नळजोडणीसारखी कामे सुरू आहेत. काही गावांमध्ये या कामांनी अंतिम टप्पा गाठला असला तरी अनेक ठिकाणी निधीचा पुरवठा वेळेवर न झाल्याने कामे अर्धवट अवस्थेत थांबलेली आहेत.
नियोजित मुदतीत कामे पूर्ण होण्यासाठी वेळेवर निधी मिळणे अत्यावश्यक असून, याबाबत ठेकेदारांकडून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. “मुदतवाढ दिली आहे हे स्वागतार्ह आहे, पण जर निधी वेळेवर मिळत नसेल, तर कामाचा वेग कसा टिकवायचा?” असा सवालही काही ठेकेदारांनी उपस्थित केला आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दूर अंतर जावे लागते. त्यामुळे ‘हर घर जल’ ही योजना ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक ठरू शकते. मात्र, तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने निधीच्या बाबतीत गंभीर पावले उचलण्याची गरज आहे. राजापूर तालुका ‘हर घर जल’च्या दिशेने वाटचाल करत असला, तरी ही वाट अजूनही खडतर असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.
राजापूरातील दीडशे गावे ‘हर घर जल’च्या प्रतिक्षेत; निधीअभावी जलजीवन मिशनला मुदतवाढ

Leave a Comment