जाकादेवी: बुधवारी निवळी ते चाफे ३३ के.व्ही मेन लाइन परतीच्या पावसामध्ये तसेच वादळी वारा,पाऊस, विजा,ढगांच्या गडगडाटामध्ये फॉल्टी झाली होती. त्यामुळे जाकादेवी, चाफे, मालगुंड, गणपतीपुळे,नेवरे तसेच,खंडाळा जयगड सैतवडे अशा भागातील वीज पुरवठा सुमारे ८ ते ९ तास खंडित झाला होता .निवळी ते चाफे हे सुमारे २२ किमीच्या अंतरामध्ये आणि वादळी वारा, पाऊस, वीजा अशा परिस्थितीत झालेल्या बिघाडामुळे लवकर निवारण करणे वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपुढे मोठ आव्हान होते. असे असले तरी ऐन वादळी वातावरणात वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी ताबडतोब एकत्रित आले. रात्री अपरात्री कर्मचाऱ्यांनी उपाशी पोटी राहून निवळी ते चाफे ३३ केव्ही लाइन पेट्रोलिंग करून सुमारे रात्री १२.३० वा. फॉल्ट काढून रात्री १ वा. खंडीत झालेली वीज पूर्ववत करण्यात यश मिळवले.
रात्री अपरात्री कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता घेतलेल्या परिश्रमाबद्दल निवळी जाकादेवी मालगुंड खंडाळा परिसरातील वीज ग्राहकांनी महावितरण शाखा जाकादेवी, मालगुंड, खंडाळा यांचे वीज कर्मचारी तसेच अधिकारी यांना मनस्वी धन्यवाद दिले. तसेच महावितरणच्या वीज ग्राहकांनी अशा अंधारमय परिस्थितीत आपला संयम दाखवून वीज मंडळ युनिटला सहकार्य केल्याबद्दल वीज मंडळातर्फे अधिकारी वर्गाने ग्राहकांना धन्यवाद दिले. विशेष म्हणजे जाकादेवी शाखा अभियंता राजेंद्र पवार हे ग्राहकांचे फोन उचलून वस्तुस्थिती सांगत होते. त्यामुळे ग्राहकांनी शाखाअभियंता श्री. पवार यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.