ग्रामस्थांनी केले उपक्रमाचे कौतुक
संगमेश्वर ( प्रतिनिधी ):- प्रथम सत्राची परीक्षा संपताच संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे शेवरवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकाशकंदील तयार करुन आपल्यातील कल्पकतेला वाव दिला. याबरोबरच पन्हाळा या किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी दीपावली सणानिमित्त करंबेळे शेवरवाडी शाळेत मुख्याध्यापिका वेदिका पराडकर, शिक्षण सेविका सुप्रिया देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळात सुंदर आकाशकंदील तयार केले. पन्हाळा किल्ला साकारण्यापूर्वी उपक्रमशील शिक्षण सेविका सुप्रिया देसाई यांनी मुलांना पन्हाळा किल्ल्याचा इतिहास, रचना समजावून सांगितली. मुलांनी हे सर्व बारकावे जाणून घेतल्यानंतर पन्हाळा किल्ला साकारण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे या उपक्रमात मुलांना मदत करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत सदस्य नारायण खाके, महिला वर्ग तसेच अंगणवाडी सेविका संचिता गोंधळी, मदतनीस प्रीती खाके, दिक्षा खाके आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालकांच्या सहभागामुळे या उपक्रमाला अधिक रंगत आली. करंबेळे शेवरवाडी शाळेच्या आकाशकंदील बनवणे आणि किल्ला उभारणे या उपक्रमाचे विस्तार अधिकारी तानाजी नाईक, केंद्र प्रमुख उज्वला धामणस्कर, सरपंच मानसी बारगुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कोमल देवळे आदिनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
करंबेळे शेवरवाडी शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील आणि किल्ले
