मंडणगड : पर्यटन आणि उन्हाळी सुट्यांचा हंगाम असूनही प्रवासी संख्येअभावी मंडणगड एस.टी. आगाराला मे महिन्यात तब्बल १४ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. विशेषतः ग्रामीण भागात केवळ ५० टक्केच प्रवासी भारमान मिळाल्याने आगाराचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाले आहे. याउलट वाहतूक खर्च वाढल्याने आर्थिक तूट वाढत चालली आहे.
आगारप्रमुख एम. बी. जुनिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडणगड आगारातून दररोज ४८ बसगाड्यांच्या एकूण १९७ फेऱ्या होतात. या फेऱ्यांद्वारे दररोज १४,५०० किलोमीटरचा प्रवास केला जातो. मात्र, या कालावधीत केवळ ३८ टक्केच प्रवासी भारमान मिळाले आहे. एस.टी. विभागाने प्रतिकिलोमीटर ५७ रुपये उत्पन्न अपेक्षित धरले असताना, प्रत्यक्षात केवळ १९ रुपये प्रतिकिमी उत्पन्न मिळत आहे, तर खर्च ३८ रुपये प्रतिकिमी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तोटा होत आहे.
ग्रामीण भागात प्रवाशांची कमतरता आणि इंधन व कर्मचाऱ्यांच्या खर्चामुळे आगाराची स्थिती गंभीर झाली आहे. मंडणगड तालुका डोंगराळ असून, अनेक ग्रामस्थ नोकरी-व्यवसायासाठी मुंबई, नालासोपारा, बोरिवली या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. अशा प्रवाशांसाठी मंडणगडहून मुंबई आणि बोरिवलीकडे जाणाऱ्या तीन महत्त्वाच्या फेऱ्या – सकाळी ६ वाजताची मंडणगड-मुंबई, ८.१५ ची मंडणगड-बोरिवली आणि सायंकाळी ५ ची मुंबई फेरी – बंद करण्यात आल्याचे स्थानिक प्रवाशांचे म्हणणे आहे. मात्र, या फेऱ्या बंद केल्या नसल्याचा दावा आगारप्रमुखांनी केला असून, प्रवासी भारमान कमी असल्यामुळे त्यातून उत्पन्न अपुरे पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंडणगड आगाराला मे महिन्यात १४ लाखांचा तोटा

Leave a Comment