GRAMIN SEARCH BANNER

नव्या हंगामासाठी मच्छीमारांची लगबग

Gramin Varta
9 Views

उरण: पावसाळ्यातील दोन महिन्यांपासून बंद असलेली खोल समुद्रातील मासेमारी सुरू होण्यासाठी काही दिवसच उरले असल्याने उरणच्या बंदरात मच्छिमारांची बोटी दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे. दोन महिने विसावलेल्या बोटी 1 ऑगस्टपासून खोल समुद्रात जाणार आहेत.

त्यामुळे ससून डॉक, करंजा, मोरा, केसारा बंदरात बोटींची गर्दी वाढली आहे. तयारीसाठी कालावधी कमी असल्याने मच्छीमारांची बोटी दुरुस्ती व तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे.

पावसाळी 61 दिवसांच्या बंदी नंतर एक ऑगस्टपासून सुरू होणार्‍या मासेमारीसाठी मच्छीमार आसुसलेले आहेत. यासाठी मच्छीमारांना शासनाकडुन मिळणारा डिझेलचा कोटा वेळेतच उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी आतापासूनच बैठका घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मात्र शासनाकडून वेळेत डिझेल कोटा मिळाला नाही तरी बाहेरून मिळणारे महागडे डिझेल खरेदी करून 1 ऑगस्ट पासून मासेमारीसाठी निघण्याची तयारीही मच्छीमारांची असल्याची माहिती करंजा मच्छीमार व्यावसायिकांनी दिली.

येथील करंजा, मोरा, कोप्रोली आदी बंदरात मासेमारी बोटीची दुरुस्ती बोटीवरील जाळ दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच इतर सुविधा निर्माण करण्यासाठी काम सुरू आहेत. उरणच्या या बंदरात एकूण 700 पेक्षा अधिक बोटींची संख्या आहे. या बोटींवर मजूर ही आता परतू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा येथील बंदर परिसर गजबजू लागले आहेत.

खोल समुद्रात जाण्याची तयारी

पावसाळ्याच्या प्रारंभापासून खवळलेला समुद्र शांत होतो. निरव, शांत झालेल्या सागरात मासेमारीसाठी पोषक वातावरण असते. खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी 10 ते 12 दिवस खर्ची घालावे लागतात. खोल समुद्रातील मासेमारीच्या एक ट्रिपसाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पध्दतीत पकडली जाते.

चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी असलेली मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पध्दतीच्या मच्छीमारांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे 50 ते 70 वाव खोल समुद्रातील (डीप फिशिंग) मासेमारीसाठी 20 दिवसांआधीपासून तयारी सुरू झाली आहे. बोटींच्या डागडूजी, रंगरंगोटी, जाळींची दुरुस्ती, इंजिन आणि इतर तत्सम कामे करण्यासाठी मच्छीमारांनी तयारी सुरू केली आहे.

Total Visitor Counter

2654336
Share This Article