GRAMIN SEARCH BANNER

महसूल विभागाची विद्यार्थ्यांसाठी भेट! पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरात ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम यशस्वी

Gramin Varta
268 Views

राजापूर/ तुषार पाचलकर: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत राबवलेल्या ‘सेवा पंधरावडा’ उपक्रमाने सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथील हजारो विद्यार्थ्यांचा मोठा ताण कमी केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सेवा पंधरवड्यांतर्गत ‘शाळा तिथे दाखला’ हा विद्यार्थी-केंद्री उपक्रम प्रशालेत यशस्वीरित्या पार पडला.

या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या न लागता, शालेय स्तरावरच आवश्यक असलेले अधिवास दाखला (डोमिसाईल), उत्पन्न दाखला आणि जातीचा दाखला इत्यादी महत्त्वाचे शासकीय दाखले प्राप्त झाले. दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या असंख्य अडचणी या एकाच कार्यक्रमामुळे दूर झाल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवर्गातून या उपक्रमाचे जोरदार कौतुक करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री. अशोकजी सक्रे आणि राजापूरचे निवासी नायब तहसीलदार माननीय श्री. विलास सरफरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर निवासी नायब तहसीलदार श्री. विलास सरफरे, प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती खरात मॅडम, पाचलचे मंडल अधिकारी श्री. संजय पवार, तळवडेच्या मंडल अधिकारी श्रीम. पूनम गावित आणि पाचलचे सरपंच तथा सहाय्यक शिक्षक श्री. बाबालाल फरास यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजापूर महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री. विलास सरफरे, मंडल अधिकारी श्री. संजय पवार, रायापाटणचे तलाठी श्री. शशिकांत कांबळे, पाचलचे तलाठी श्री. एल. एस. नरके, सहाय्यक शिक्षक श्री. बाबालाल फरास, श्री. सिद्धार्थ जाधव सर, श्री. मदने सर, पोलीस पाटील महेंद्र जाधव आणि प्रशालेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. शासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दाखले थेट शाळेत उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2648121
Share This Article