मोबाईलवर महिलांचे नंबर होते म्हणून पतीवर घेतला संशय
रत्नागिरी : शहरातील गयाळवाडी परिसरात कौटुंबिक वादातून एका विवाहितेवर तिच्या पती आणि सासूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विवाहिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला निधी श्वेतांग वायंगणकर (वय २७) आणि तिचा पती श्वेतांग प्रदीप वायंगणकर (वय ३१) यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होते. पतीच्या मोबाईलमध्ये इतर काही महिलांचे नंबर सापडल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. याच वादातून गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.
घराजवळील वडापावच्या गाडीजवळ निधी वायंगणकर एकटी असताना तिचा पती श्वेतांग तेथे पोहोचला. त्याने पत्नीसोबत जोरदार वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने लोखंडी साखळी आणि हाताने निधीच्या पाठीवर, हातांवर आणि पायांवर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी श्वेतांगची आई, म्हणजेच निधीची सासू प्रार्थना प्रदीप वायंगणकर (वय ५८) देखील तिथे आली. तिने लाकडी बांबूने निधीला मारहाण केली. आरोपी श्वेतांगने निधीला “ठार मारण्याची धमकी” देखील दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात निधी वायंगणकर गंभीर जखमी झाली असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर निधीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी श्वेतांग वायंगणकर आणि प्रार्थना वायंगणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रत्नागिरी : गयाळवाडी येथे पतीची पत्नीला बेदम मारहाण, महिला गंभीर जखमी; पती, सासूवर गुन्हा
