तुषार पाचलकर / राजापूर : शेतात काम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका ५७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ७ सप्टेंबर) दुपारी घडली. अचानक छातीत कळ आल्याने ते जागेवरच कोसळले, मात्र उपचारासाठी रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
प्रकाश गोविंद कांबळे (वय ५७, रा. आजिवली, बौद्धवाडी, ता. राजापूर) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रोजच्याप्रमाणे, रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या ‘दसुर खाना’ नावाच्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारपर्यंत काम केल्यानंतर, एक वाजण्याच्या सुमारास ते घरी परत येत होते. परंतु, वाटेत अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने ते रस्त्यातच खाली बसले आणि काही क्षणांतच त्यांना चक्कर येऊन ते कोसळले. त्यांच्यासोबत असलेल्या रमेश नरसू कांबळे आणि सचिन भगवान कांबळे यांनी तातडीने घरी आणले गेले.
घरी आणल्यानंतर लगेचच त्यांना एका खाजगी रिक्षातून उपचारासाठी रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. परंतु, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. डॉक्टरांनी ईसीजी तपासणी केल्यानंतर सायंकाळी ५.४० वाजता प्रकाश कांबळे यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे आजिवली गावात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजापूर : आजिवलीतील वृद्धाचा शेतात काम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू






