GRAMIN SEARCH BANNER

निवडणूक कारणावरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, वाहनांची मोडतोड

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीच्या कारणावरून मिरजेतील इस्त्रायलनगरमधील भाजप उमेदवाराच्या घरावर रात्री अज्ञातांनी हल्ला केला असून यावेळी एका मोटारीसह दोन दुचाकींची मोडतोड करण्यात आली.हा हल्ला शिवसेना (शिंदे) समर्थंकांनी केला असल्याचा आरोप महिला उमेदवाराच्या मुलाने केला आहे.

महापालिका प्रभाग तीन मध्ये भाजपच्या उमेदवार सुनिता व्हनमाने यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री अज्ञात दोघांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी दारासमोर लावण्यात आलेल्या मोटारीवर (एमएच बीए ००९३) कोयत्याने घाव घालून काच फोडली आहे. तसेच दारासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकींचीही मोडतोड करण्यात आली आहे.

दरम्यान, उमेदवारांचा मुलगा संदीप व्हनमाने यांनी हा हल्ला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकाकडून करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आम्हाला वनखंडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याच परिसरात चार दिवसापूर्वी येथे व्हनमाने व वनखंडे समर्थकामध्ये बाचाबाची होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. याबाबत पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण परस्पर मिटविण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजणेच्या सुमारास दहा ते पंधरा जणांनी व्हनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला. यावेळी घरासमोर असलेल्या चारचाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या. दुचाकीची मोडतोड करण्यात आली. यावेळी व्हनमाने समर्थकही जमल्याने हेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले. हल्लेखोरामध्ये खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील काही संशयित असल्याचा आरोपही व्हनमाने यांनी केला आहे. हल्ल्याचा प्रकार चलतचित्रीकरणामध्ये कैद झाला असून त्यांचे चित्रण पोलीसांना देण्यात आले आहे.

या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून छायाचित्रणाच्या आधारे संशयितांचा शोध घेउन कारवाई करण्यात येत असल्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर वनखंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या घटनेची सखोल चौकशी करून पोलीसांनी संशयितावर कारवाई करावी. मात्र, या घटनेच्या माध्यमातून मतदारांची सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न मतदार कदापि यशस्वी होउ देणार नाहीत.

Total Visitor Counter

3486895
Share This Article