GRAMIN SEARCH BANNER

रिव्हर्स घेताना अंदाज चुकला अन् डंपर दरीत कोसळला; २७ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
129 Views

खेड: तालुक्यातील सुकवली-क्रशर परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुण डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. रिव्हर्स घेत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खडी वाहतूक करणारा डंपर तब्बल ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०८ डब्ल्यू ८४७१ क्रमांकाचा डंपर खडी वाहतूक करत होता. सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास सुकवली-क्रशर परिसरात चालक डंपर रिव्हर्स घेत असताना त्याचा अंदाज चुकला. क्षणात वाहनावरील ताबा सुटला आणि डंपर रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळला.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत चालक नितीन विजय पवार (वय २७, रा. चिंचघर-दस्तुरी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून काही काळ एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची २४ तास विनामूल्य अपघात मदत सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्काळ मदतकार्य करत मृत चालकाला उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे हलविले.
अवघ्या २७ व्या वर्षी काळाने झडप घातल्याने नितीन पवार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे चिंचघर-दस्तुरी परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण आणि तांत्रिक बाबींचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

3486768
Share This Article