GRAMIN SEARCH BANNER

शेतकऱ्यांना बांधावर खते द्या, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढा; खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

Gramin Varta
16 Views

रत्नागिरी: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते आणि बियाणांचा पुरवठा वेळेवर होणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत खतांचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही, त्यामुळे बाजारपेठेत खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती तातडीने शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सभापती महेश नाटेकर, सभापती नंदकुमार मुरकर, सभापती प्रणव पोळेकर, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कृषी विभागाला मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यासाठी सहकारी संघांच्या कार्यालयात फेऱ्या मारायला लागू नयेत, तर त्यांना त्यांच्या थेट शेताच्या बांधावर खते मिळाली पाहिजेत अशी चोख व्यवस्था करा. या खत वाहतुकीसाठी आवश्यकता भासल्यास स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खत पुरवठ्या संदर्भात सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश देत त्यांनी, रेल्वे प्रशासनाने देखील स्थानिक शेतकऱ्यांसाठी मालगाडीतून येणाऱ्या खतांच्या वाहतुकीला आणि उतरवून घेण्याला प्राधान्य द्यावे, असे सुचवले.

जिल्ह्यातील भात उत्पादनावर बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या २१ ठिकाणी सुसज्ज शेल्टर हाऊस उपलब्ध आहेत, या जागांचा वापर भात खरेदी केंद्रांसाठी करण्यात यावा. यावर्षी जिल्ह्यात ४० हजार टन भात खरेदी झाली असून आगामी हंगामात हे उद्दिष्ट ७५ हजार टनांपर्यंत नेण्यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत. तसेच नाविन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. फळपीक विमा आणि भात पीक विमा योजनेची इत्थंभूत माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून त्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने गावपातळीवर व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करावी, जेणेकरून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याकडे पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष वेधले. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील भात लागवड क्षेत्र, फळबाग लागवड, औषधे, खते आणि बियाणांच्या उपलब्धतेबाबत सविस्तर तांत्रिक माहिती सादर केली.

Total Visitor Counter

3401479
Share This Article