GRAMIN SEARCH BANNER

घरगुती वादातून रिक्षामध्येच मुलावर चाकूने वार; रत्नागिरीतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Gramin Varta
667 Views

रत्नागिरी: पत्नीसोबत फोनवर झालेल्या वादाचा राग अनावर झाल्याने एका निर्दयी पित्याने आपल्या आठ वर्षांच्या निष्पाप मुलाच्या हातावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे स्टेशन फाटा येथील माने पेट्रोल पंपासमोर ५ मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमेश उदय यादव (वय ३७, रा. शांतीनगर नाचणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

आरोपी महेश उदय यादव (वय २६, रा. निवे बुद्रुक सरोदेवाडी, ता. संगमेश्वर) हा आपला मुलगा तेज (वय ८) याला रिक्षातून मारुती मंदिर येथे फिरवण्यासाठी घेऊन गेला होता. मुलाला सँडविच आणि आईस्क्रीम खायला दिल्यानंतर, आरोपीला महालक्ष्मी खेडशी येथील एक भाडे मिळाले. ते भाडे सोडून परत येत असताना आरोपीचा त्याच्या पत्नीसोबत फोनवर मोठा वाद झाला. या वादातून आलेल्या रागाच्या भरात आरोपीने कवारचाय फाटा येथे आपली रिक्षा (क्र. MH 08 AQ 3346) थांबवली आणि रिक्षामध्ये बसलेल्या आपला मुलगा तेज याच्या डाव्या हाताच्या मनगटावर चाकूने वार केले.या जीवघेण्या हल्ल्यात चिमुरडा तेज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महेश यादव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3181617
Share This Article