मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर झाला असून, जिल्ह्यातील नऊ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यंदा एकूण २७ प्रस्तावांपैकी ही निवड झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. गणेशोत्सवानंतर लवकरच एका विशेष समारंभात या शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
ज्या नऊ शिक्षकांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
संजय करावडे (पदवीधर शिक्षक, जि.प. पू. प्राथमिक मराठी शाळा, बामणघर, मंडणगड)
जावेद शेख (उपशिक्षक, जि.प. आदर्श प्राथमिक शाळा नं. १, वाकवली, दापोली)
एकनाथ पाटील (पदवीधर शिक्षक, जि.प. पू. प्राथमिक शाळा नं. १, सवेणी, खेड)
नरेश मोरे (पदवीधर शिक्षक, पाग मुलांची शाळा, चिपळूण)
चंद्रकांत बेलेकर (उपशिक्षक, जि.प. पू. प्राथमिक आदर्श शाळा नं. १, जानवळे, गुहागर)
विनय होडे (पदवीधर शिक्षक, जि.प. पू. प्राथमिक आदर्श शाळा नं. १, हातीव, संगमेश्वर)
प्रदीप जाधव (पदवीधर शिक्षक, जि.प. पू. प्राथमिक आदर्श शाळा, आंबेकरवाडी, भोके, रत्नागिरी)
नितीन शेंडगे (उपशिक्षक, जि.प. पू. प्राथमिक आदर्श शाळा नं. १, वाकेड, लांजा)
सुहास काडगे (पदवीधर शिक्षक, जि.प. पू. प्राथमिक गोखले कन्या शाळा, राजापूर)
या पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करताना अनेक महत्त्वपूर्ण निकषांचा विचार करण्यात आला. यामध्ये शैक्षणिक पात्रता, गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन, शैक्षणिक संशोधन, लेख तसेच व्याख्याने, नवभारत साक्षरता अभियान आणि मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियान यांसारख्या शासकीय योजनांमधील सहभाग, तसेच वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले लेख यांसारख्या बाबींना महत्त्व देण्यात आले.
याशिवाय, शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न, नवोदय विद्यालयांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन, आणि ग्रामीण भागात केलेल्या विशेष सेवा कार्यांचाही या निवड प्रक्रियेत समावेश होता. या सर्व निकषांवर आधारित मूल्यांकन करूनच या नऊ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या या सन्मानित पुढाकारामुळे, शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल योग्य ती ओळख मिळत आहे, ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल.





