राजापूर: राजापूर शहरात ऑनलाईन फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली असून आरटीओ ई-चलनच्या बहाण्याने एका व्यक्तीला तब्बल ३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमीर निझामउद्दीन खलिफे (वय ४५, रा. जवाहर चौक, राजापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी यांचे वडील निझामउद्दीन खलिफे यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने ‘RTO E-Challan.apk’ नावाची एक फाईल पाठवली होती. ही फाईल फिर्यादीच्या वडिलांनी त्यांना फॉरवर्ड केली. फिर्यादी जमीर खलिफे यांनी सदर फाईलवर क्लिक करून ती ओपन केली असता, अज्ञात आरोपीने त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवून इंडसइंड बँकेच्या बचत खात्यातून एकूण ३,००,००० रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केले.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खलिफे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनंतर राजापूर पोलिसांनी २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:५३ वाजता गुन्हा र. नं. १०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात सायबर चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता तांत्रिक तपास करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा ‘एपीके’ फाईल्सवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






