रत्नागिरी : जयगडमधील नांदिवडे येथील ‘ओशियन बीच’ (नवीन नाव सीडेक सॅण्डी रिट्रीट रिसॉर्ट) चालवण्यास दिलेल्या करारामध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी, रिसॉर्ट मालक डॉ. योगेश मनमोहन जोग आणि मनमोहन जोग या दोघांविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील ६५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी सुमारे ९ लाख रुपयांची फसवणूक केली असून, यात ५ लाख रुपये रोख रकमेचा आणि ४ लाख रुपयांच्या जुन्या वस्तूंचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांनी आरोपी डॉ. योगेश मनमोहन जोग आणि मनमोहन जोग यांच्या मालकीचे नांदिवडे येथील रिसॉर्ट ०६ जानेवारी २०२५ ते २० मे २०२५ या कालावधीसाठी तोंडी करारावर चालवण्यासाठी घेतले होते.
करारानुसार, रिसॉर्ट सोडण्यापूर्वी एक महिना आधी कळवणे आवश्यक होते. मात्र, महिलेचे पती अचानक आजारी पडल्याने त्यांना औषधोपचारासाठी रिसॉर्ट मुदतीपूर्वीच, म्हणजे दोन महिने आधी सोडावे लागले. त्यांनी याबद्दल आरोपी योगेश जोग याला कळवले होते. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, रिसॉर्टमध्ये आधीच काही बुकिंग्ज असताना आणि करार मुदत संपण्यापूर्वीच आरोपी क्रमांक १ व २ यांनी संगनमत करून, फिर्यादींच्या अनुपस्थितीत कामगारांकडून रिसॉर्टचा ताबा घेतला. तसेच, त्यांनी आरती चाफेकर यांना ५ लाख रुपयांची डिपॉझिट रक्कम आणि रिसॉर्टमध्ये असलेल्या ४ लाख रुपये किमतीच्या जुन्या वापरत्या वस्तू परत न देता एकूण ९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
या व्यतिरिक्त, महिला रिसॉर्ट चालवत असताना आरोपी मनमोहन जोग याने अश्लील शब्द वापरून महिलेच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.
जयगडमध्ये रिसॉर्ट मालकांकडून वृद्ध महिलेची ९ लाखांची फसवणूक; डॉक्टर पिता – पुत्रावर गुन्हा
