रत्नागिरी : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच रत्नागिरी तालुक्यातील खानू गावात एका पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्या कपाळाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी आरोपी पती दीपक कृष्णा सुतार याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिव्या दीपक सुतार (वय ३९) आणि आरोपी दीपक सुतार हे पती-पत्नी आहेत. आरोपीला दारूचे व्यसन असून, याच व्यसनामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत असत. १५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास दिव्या आपल्या घरात झोपलेली असताना, दारूच्या नशेत असलेला दीपक तिच्याजवळ आला आणि त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपीने दिव्याच्या तोंडावर हाताने मारले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने तिचे डोके घरातील दगडाच्या भिंतीवर आपटले. यात दिव्याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. मारहाणीदरम्यान, आरोपीने तिला ‘ठार मारण्याची’ धमकीही दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या दिव्याने सकाळी ७.१७ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी खानू येथे पतीकडून पत्नीला मारहाण; कपाळाला दुखापत
