रत्नागिरी : तालुक्यातील गोळप दर्गास्टॉप परिसरात मंगळवारी रात्री एका व्यक्तीकडून धारदार लोखंडी सुरा सापडल्याने संबंधित व्यक्तीविरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र भिकाजी जांभळे (वय 62, रा. गोळप-कातळवाडी) असे संशयिताचे नाव आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रवींद्र हा गोळप परिसरात हातात लोखंडी सुरा घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून धारदार सुरा जप्त करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 122 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी : गोळप येथे धारदार सुरा बाळगणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल
