कडवई/ मिलिंद चव्हाण: देवरूख नगरपंचायतीची आगामी निवडणूक विकासाचे व्हिजन घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने लढवणार असून, या निवडणुकीसाठी मनसेतर्फे ५ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहेत. असे असले तरी नगराध्यक्षपदासाठी मनसेचा अधिकृत उमेदवार नसल्यामुळे, या पदासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ‘नोटा’ (NOTA) या पर्यायाचा वापर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मनसेचे नेते जितेंद्र चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
देवरूख येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक प्रश्नांवरून प्रशासनावर जोरदार टीका केली. देवरूख हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असूनही शहरात नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच नगरपंचायत इमारतीचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही, शहरात वीज वाहिन्यांचे जाळे विस्कळीत आहे आणि वाहतूक कोंडीसारख्या गंभीर समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी नगरसेवक असणे गरजेचे असल्याने मनसेने या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी, ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे तिथे निवडणूक लढवण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार देवरूखमध्ये मनसेची ताकद लक्षात घेता ही निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. मात्र, नगराध्यक्षपदाचा उमेदवार नसल्याने त्या पदासाठी केवळ ‘नोटा’ला मतदान करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेला मनसेचे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, देवरूख शहराध्यक्ष सागर संसारे, उपशहराध्यक्ष अक्षय झेपले, शहर सचिव तुषार बांडागळे, मनविसेचे शहराध्यक्ष ऋतुराज देवरूखकर, कार्यालयीन प्रमुख विलास खोचाडे, शाखाध्यक्ष ओंकार विंचू, सरताज कापडी, सलमान बोदले, परेश धामनाक यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







