रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन (शिरगाव) येथे कांदळवन सप्ताहानिमित्त दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी समुद्री कासव संवर्धन या विषयावर मोहन उपाध्ये यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
हा कार्यक्रम जलजीविका संस्था व कांदळवन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने झाला. उपाध्ये यांनी समुद्री कासवांच्या सात प्रमुख प्रजाती, त्यांची वैशिष्ट्ये, ओळख पद्धती आणि संवर्धनाच्या गरजेविषयी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समुद्री परिसंस्थेतील कासवांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी उदाहरणे आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहिती दिली. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी उपाध्ये यांची ओळख करून केली. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी जलजीविका संस्था व कांदळवन प्रतिष्ठानचे पदाधिकारी, तंत्रनिकेतनमधील शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक नीलेश मिरजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे तसेच कार्यालय अधीक्षक विलास यादव यांनी विशेष मेहनत घेतली.
रत्नागिरी : ‘समुद्री कासव संवर्धन’ विषयावर मोहन उपाध्ये यांचे मार्गदर्शन
