GRAMIN SEARCH BANNER

आंबा घाटात ३ बोगद्यांसाठी सर्वेक्षण

मिऱ्या-नागपूर महामार्गाला गती : २४०० कोटींचा खर्च अपेक्षित

रत्नागिरी : मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामागांच्या कामाने गती घेतली आहे. मिऱ्या ते आंबा हा ५७ किमीचा टप्पा आहे. याच मार्गावरील आंबा घाटात भुयारी मार्ग काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. घाट एका रेषेत नसल्याने ३ बोगदे खोदावे लागणार आहेत. ६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. यासाठी सुमारे २४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मिऱ्या ते आंबा घाट असा सुमारे ५७ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाला ९३० कोटी खर्च येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ७८ टक्के काम झाले असून, उर्वरित काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ४१ किमीचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून १६ किमीचे काम अपूर्ण आहे. सध्या आंबा घाटातील दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी एका बाजूने काम सुरू झाले आहे; पण आता आंबा घाटात ३ बोगदे म्हणजे भुयारी मार्गाचा विचार आहे. त्या कामाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. हा घाट पूर्णतः एका रेषेत नसल्याने ३ बोगदे खोदावे लागणार आहेत. ६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी २४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात येणार असून, तो शासनदरबारी मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. एकूणच मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे.

ठेकेदार कंपनीदेखील स्थानिकांच्या अपेक्षेचा विचार करून कामांमध्ये सुधारणा आणि दुरुस्ती करत आहेत. त्यामुळे मार्च २०२६ मध्ये मिऱ्या आंबाघाटाचा हा टप्पा पूर्ण होईल, असा दावा ठेकेदार कंपनीने केला आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गावरील महत्त्वाचे काम म्हणजे आंबाघाटातील बोगदा आणि रेल्वेस्थानक ते आंबेडकर भवन उड्डाणपूल या कामांचा समावेश आहे. त्याच्या दोन वेगवेगळ्या निविदा काढण्यात येतील, असे ठेकेदार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Total Visitor Counter

2475126
Share This Article