पारंपरिक ‘गजा नृत्य’ स्पर्धेत यंग स्टार ओझर संघ विजेता
राजापूर/तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यातील पाचल कोंड धनगरवाडी येथे युवा मित्रमंडळाच्या वतीने स्वर्गीय महादेव पटकारे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला भव्य दसरा सोहळा आणि पारंपरिक धनगरी गजा नृत्य स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाचल येथील श्री महागणपती सभागृहात आयोजित या सोहळ्याला परिसरातील सुमारे ५०० ते ५५० समाजबांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या पारंपरिक धनगरी गजा नृत्य स्पर्धेत प्रेक्षकांना धनगरी संस्कृतीच्या ताल आणि उत्साहाचा अनुभव घेता आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी सादर केलेल्या नृत्यांनी संपूर्ण सभागृहात चैतन्य निर्माण केले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत ‘यंग स्टार ओझर’ संघाने प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरत विजेतेपद पटकावले, तर ‘लक्ष्मी माता करक’ संघाने दमदार सादरीकरण करत द्वितीय क्रमांक मिळवला.
युवा मित्रमंडळ, पाचलकोंड धनगरवाडीचे अध्यक्ष सिताराम बावदाने यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा ऐतिहासिक ठरला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कार्यकारिणी सदस्य (महाराष्ट्र राज्य) आबासाहेब पाटील (शाहुवाडीकर), पाचलचे उपसरपंच आत्माराम सुतार, माजी सरपंच अपेक्षा मासये, माजी उपसरपंच किशोर (भाई) नारकर, विलास परुळेकर यांच्यासह समाजातील अनेक वरिष्ठ मंडळी, महिला आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मंडळाने एक स्तुत्य उपक्रम राबवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त उपस्थित महिलांचा विशेष सन्मान केला. तसेच सर्व मान्यवरांना पुण्यश्लोक अहिल्याबाईंची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेत विजेते ठरलेल्या ‘यंग स्टार ओझर’ संघाने देखील आयोजक मंडळाचा विशेष सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
सांस्कृतिक, सामाजिक आणि पारंपरिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या या सोहळ्यानंतर उपस्थित सर्व समाजबांधवांनी धनगरी पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेतला. युवा मित्रमंडळाने आयोजित केलेला हा भव्य दसरा सोहळा पाचल धनगरवाडीच्या सांस्कृतिक परंपरेची आठवण करून देणारा आणि सर्वांना एकत्र आणणारा ठरला.