खेड : तालुक्यातील देवघर-निवीवाडी येथील पंढरीनाथ मोरे यांच्या मालकीच्या एका गाईवर शनिवारी दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ मोरे यांनी आपली गाय नेहमीप्रमाणे रानात चरण्यासाठी सोडली होती. त्याचवेळी झुडपात लपून बसलेल्या एका बिबट्याने अचानक गाईवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गाय जबर जखमी झाली. मोरे यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली, मात्र अद्यापपर्यंत वनविभागाकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देवघर आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून, जनावरांवरील हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्याला जेरबंद करावे आणि ग्रामस्थांची भीती कमी करावी, अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाने तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.