GRAMIN SEARCH BANNER

दापोली एसटी डेपोत विद्यार्थ्याच्या पायावरून गेले बसचे चाक; बेजबाबदार चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
207 Views

दापोली: दापोली एसटी बस स्थानक परिसरात भरधाव आणि बेजबाबदारपणे बस चालवून एका तरुणाला जखमी केल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एका पादचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
याप्रकरणी नवमान नजीर गिलगिले (वय १८, रा. केळशी मदनतरी, ता. दापोली) याने दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्याच्या फिर्यादीवरून एसटी चालक किरण महादेव मोरे (वय ३४, रा. दापोली) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवमान हा आपल्या ताहीद चौस आणि आफिक अरे या मित्रांसह गावी जाण्यासाठी दापोली एसटी स्थानकात आला होता. यावेळी डेपोमध्ये उभ्या असलेल्या एमएच २० बीएल २२७३ या क्रमांकाच्या बसच्या चालकाने आपले वाहन मागे घेत असताना अत्यंत निष्काळजीपणा दाखवला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने नवमानच्या पायाला जोराची धडक दिली. या धडकेत नवमानच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी चालकाने दाखवलेल्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दापोली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3073036
Share This Article