GRAMIN SEARCH BANNER

डिंगणी-पिरंदवणे मार्गावर मृत्यूची चाहूल; गव्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थ भयभीत, वनविभागाच्या कारभारावर संताप

Gramin Varta
675 Views

संगमेश्वर/एजाज पटेल : तालुक्यातील डिंगणी ते पिरंदवणे या वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर सध्या मृत्यूची चाहूल लागल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. या परिसरात महाकाय आणि आक्रमक अशा गव्याने  उच्छाद मांडला असून, त्याच्या या खुलेआम वावरण्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आधीच बिबट्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या या भागातील ग्रामस्थांवर आता गव्याच्या रूपाने नवे संकट ओढवले असून, यामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

आजवर केवळ चित्रात किंवा दूरदर्शनवर दिसणारा हा महाकाय प्राणी आता थेट मानवी वस्तीत, भररस्त्यावर आणि शेतकऱ्यांच्या शेतशिवारात बिनदिक्कतपणे वावरताना दिसत आहे. सकाळच्या वेळी किंवा सायंकाळी या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे ठरत आहे. गव्याच्या या मुक्त संचारामुळे कधीही मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका स्थानिक शेतकरी वर्गाला बसला आहे. शेतीची कामे करण्यासाठी शिवारात जाण्याचे धाडस कोणामध्येही उरलेले नाही, त्यामुळे हाताशी आलेली पिके आणि दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. दुसरीकडे, शालेय विद्यार्थी आणि पालकांमध्येही प्रचंड घबराट असून, मुलांना शाळेत पाठवताना पालकांची घालमेल होत आहे.

एकीकडे नागरिक दहशतीखाली असताना, दुसरीकडे वनविभागाची भूमिका मात्र संतापजनक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एवढा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही वनविभागाकडून अद्याप कोणतीही ठोस किंवा प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. वनविभाग अजूनही ‘निद्रिस्त’ अवस्थेत असल्याने प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी एखाद्या निष्पाप जिवाचा बळी जाण्याची वाट पाहिली जात आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. वनविभागाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन गव्याचा बंदोबस्त करावा आणि त्याला सुरक्षितपणे अधिवासात हलवून ग्रामस्थांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3109117
Share This Article