GRAMIN SEARCH BANNER

मानसिक व लैंगिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दुबईत दखल; रत्नागिरीच्या डॉ. अतुल ढगे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान

Gramin Varta
145 Views

रत्नागिरी: मानसिक आणि लैंगिक आरोग्य या महत्त्वपूर्ण पण संवेदनशील क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने जनजागृती, उपचार, प्रशिक्षण आणि समाजउपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल माईंड केअर हॉस्पिटल चे संस्थापक आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लैंगिकतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांना ‘Global Leader in Mental & Sexual Health Awareness – 2025’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान Saksham International Business Awards 2025 या भव्य समारंभात, हॉटेल अल खोरी स्काय गार्डन, दुबई, UAE येथे देण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रेबेका जे. डाल, अध्यक्ष – Global Academic Forum (GAF), United States होत्या.

डॉ. अतुल ढगे गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आणि लैंगिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रात सामाजिक संवेदना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकाभिमुख दृष्टीने कार्यरत आहेत. मानसिक आरोग्याविषयी भीती, गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करण्यासाठी त्यांनी Mindcare Marathon, माईंडकेअर एक्स्प्रेस, जागर मनोआरोग्याचा उपक्रम, मनोमित्र कार्यशाळा आणि COVID काळातील Sukoon कार्यक्रम असे अनेक प्रभावी उपक्रम राबविले. त्याचबरोबर “Remove Stigma Campaign” मार्फत त्यांनी तरुण, विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत जागरूकतेचा नवा संदेश पोहोचवला आहे.

डॉ. ढगे यांनी मानसिक आणि लैंगिक आरोग्यावर १००० पेक्षा अधिक लेख विविध प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केले असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत शेकडो व्याख्याने, जनजागृती व्हिडिओ, समुपदेशन मालिकांद्वारे ते निरंतर सामाजिक संवाद साधत असतात. NIMHANS, बेंगळुरू येथील Professional Skills & Leadership Training (2014) कार्यक्रमासाठी आशियातील केवळ १७ तज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली होती. तसेच त्यांना Pride Bharat Award, नवी दिल्ली येथे Most Trusted Psychiatrist & Sexologist – 2024 हा पुरस्कार Actor अर्जुन कपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

लैंगिक आरोग्यावरील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी Red Apple Sexual Wellness Clinic ही भारतातील पहिली discreet sexual wellness service सुरू केली असून गोपनीय, सुरक्षित आणि वैज्ञानिक मार्गदर्शनाची नवी दिशा त्यांनी निर्माण केली आहे.
या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल बोलताना डॉ. ढगे म्हणाले,“ही जागतिक मान्यता माझ्या रुग्णांची, माईंडकेअर टीमची आणि समाजासाठी मानसिक व लैंगिक आरोग्य सेवेत विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची आहे. या नव्या सन्मानानंतर या कामाबाबत माझी जबाबदारी वाढली आहे ववचनबद्धता आणखी दृढ झाली आहे.”

Total Visitor Counter

3366983
Share This Article