बावनदी येथे घडली घटना
रत्नागिरी : एसटी बसमधून प्रवास करताना सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडण्याचे प्रकार नवीन नाहीत, मात्र या वादाचे पर्यवसान आता थेट मारहाणीत होऊ लागले आहे. खेड ते रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने केवळ नऊ रुपयांचे सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून कर्तव्य बजावत असलेल्या वाहकाला शिवीगाळ करत त्याच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बावनदी बस स्टॉपजवळ घडली असून, याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम परमेश्वर बांगर (वय ३४, सध्या रा. भरणेनाका, खेड, मूळ रा. बीड) असे फिर्यादी एसटी वाहकाचे नाव आहे. ते खेड आगारामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते एसटी बस (क्र. एमएच २० बीएल १९६०) घेऊन खेड-चिपळूण-संगमेश्वर-रत्नागिरी या मार्गावर निघाले होते. बसवर चालक म्हणून गणेश गुलाब गाडेकर हे होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास बस बावनदी पुलाजवळील बस स्टॉपवर आली असता, तिथे काही प्रवासी उतरले आणि चार नवीन प्रवासी बसमध्ये चढले. यावेळी आरोपी संकेत लक्ष्मण तांबे (वय २६, रा. वेळंब, ता. गुहागर) याने बावनदी ते रत्नागिरी असे तिकीट मागितले. ४१ रुपये तिकीट दर असताना आरोपीने ५० रुपयांची नोट दिली. त्यावेळी वाहक बांगर यांच्याकडे ९ रुपये सुट्टे उपलब्ध नव्हते.
यावर तोडगा काढण्यासाठी वाहक सखाराम बांगर यांनी आरोपीला विनंती केली की, “तुम्ही मला १ रुपया द्या, म्हणजे मी तुम्हाला १० रुपये परत करतो, किंवा रत्नागिरीला उतरताना सुट्टे पैसे जमा झाले की देतो. तसे नसल्यास तिकीटाच्या मागे ९ रुपये थकबाकी लिहून देतो, ते तुम्ही रत्नागिरी डेपोतून घ्या.” मात्र, वाहकाच्या या पर्यायांवरून आरोपी संकेत तांबे याचा पारा चढला. “तुम्ही खेडमधून आलात आणि तुमच्याकडे पैसे नाहीत?” असे उर्मटपणे बोलून त्याने वाहकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात आरोपीने वाहक बांगर यांच्या डाव्या गालावर दोन वेळा जोरात थापड मारली आणि शिवीगाळ करत झटापट केली. भर बसमध्ये चालू असलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सरकारी सेवक आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना मारहाण करून कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वाहक सखाराम बांगर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी संकेत लक्ष्मण तांबे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३२ (सरकारी कामात अडथळा), १२१(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
तुम्ही मला १ रुपया द्या, मी तुम्हाला १० रुपये परत करतो…सुट्ट्या पैशावरून प्रवाशाने कंडक्टरच्या कानशिलात लगावली







