राजापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जगप्रसिद्ध गंगातीर्थाजवळ असलेल्या तीर्थक्षेत्र ओणी येथील स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ९ जुलै ते गुरुवार, १० जुलै या दोन दिवसांमध्ये हा धार्मिक सोहळा उत्साहात साजरा होणार आहे.
या दोन दिवसीय उत्सवात भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, होमहवन, भंडारा यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच या निमित्ताने स्वामी उल्हासगिरी महाराज यांचा जन्मदिनही साजरा करण्यात येणार आहे.
बुधवार, ९ जुलै रोजी सायंकाळी स्वामी उल्हासगिरी महाराज यांचा जन्मदिन साजरा करण्यात येणार असून, या वेळी महाराजांचे पाद्यपूजन, औक्षण, ५६ भोग नैवेद्य अर्पण आणि महाआरती होईल. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१० जुलै रोजी पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी मंगळआरती होईल. स्वामी योगिराज गगनगिरी महाराजांच्या पादुकांवर अभिषेक करण्यात येईल. दुपारी १२ वाजता होमहवन, महाआरती आणि त्यानंतर महाप्रसाद होईल.
या दिवशी भजन सम्राट विजय परब आणि त्यांच्या मंडळींच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर स्थानिक भजनी मंडळाचे भजन होईल आणि शेवटी आरतीनंतर पुन्हा भाविकांसाठी महाप्रसाद दिला जाईल.
उत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपस्थित राहणाऱ्या सर्व साधू-संतांचा सत्कार समारंभही संस्थानच्या वतीने पार पडणार आहे, अशी माहिती आश्रमाचे प्रमुख प.पू. श्री. उल्हासगिरी महाराज यांनी दिली.
राजापूर ओणी येथील आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन
