लांजा: तालुक्यातील कोलधे कुंभारवाडी येथे अनिल तांबे दुकान ते कुंभारगावाकडे जाणारा वहाळावरील मोडकळीस आलेला लोखंडी साकव बुधवार २५ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसात झाडाची फांदी पडून कोसळला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे.
कोलधे येथील अनिल तांबे ते कुंभारगावाकडे जाणारा १५० मीटर लांबीचा वहाळावरील साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. साकवाची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करत होते. मुसळधार पावसामुळे आंबा कलमाची फांदी पडल्याने अखेर २५ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास साकव पूर्णपणे मोडून पडला. दरम्यान, घटना घडली त्यावेळी साकवाजवळ असणारी व्यक्ती बालंबाल बचावली.
साकव कोसळल्याने कुंभार गावाचा कोलधे गावाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे शाळा, दुकान व पोस्टाच्या कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ग्रामस्थांकडून गेले अनेक वर्षे पुलाची मागणी सातत्याने करण्यात येत होती. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका अखेर कोलधे ग्रामस्थांना बसला आहे.
लांजा: कोलधे कुंभारवाडी येथे झाडाची फांदी पडून साकव कोसळला
