मुरूड : मुरूड तालुक्यातील साळाव-बिर्ला मंदिरानजीकच्या मिठेखार गावात मंगळवारी (दि.19) सकाळी दरड कोसळून एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा करुण अंत झाला.
विठाबाई मोतीराम गायकर असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या वृद्धेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थ करत आहेत.
मंगळवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास पावसाची संततधार सुरू असतानाच, मिठेखार गावाच्या डोंगराचा काही भाग अचानक विठाबाई गायकर यांच्या घराच्या मागील बाजूस कोसळला. काही कळण्याच्या आतच माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिठेखारचे पोलिस पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याला कळवली. यानंतर पोलिस ठाण्याचे इन्चार्ज सहा. पोलिस निरिक्षक श्रीकांत किरविले यांनी घटनास्थळी भेट दिली.
‘सावित्री’ने गाठली धोक्याची पातळी, आंबेवाडी येथे दुकानांत पाणी
यावेळी मिठेखार गावात पंचक्रोशीतील संप्तत जमाव जमा झाला आणि शासनाच्या दुर्लक्षतेबाबत संप्तत प्रतिक्रिया व्यक्त केली. घटनास्थळी अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, मुरूड तहसिलदार आवेश डफळ, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी मंगेश पाटील, अभियंता मुरूड पंचायत समिती आशिष मुकणे आणि साळाव तलाठी आदी शासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले.
यावेळी मिठेखार ग्रा. प. सदस्य व सदस्या, माजी जि. प. सदस्या राजश्री मिसाळ, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे आदी त्वरीत दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच माजी जि. प. सदस्या मानसीताई दळवी, तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शासकीय अधिकारी यांनी दुर्देवी वृध्द महिलेच्या कुटूंबाला तातडीने शासकीय मदत निधीचा धनादेश जाहीर केला.
मिठेखार गावावरील मूळ धोका कायम
मिठेखार डोंगराला भेग गेल्याने दरड पडण्याची भीती आहे. त्यामुळे गावावरील धोका कायम आहे. कोसळलेल्या दरडीमुळे मृत महिलेच्या घरासह इतरही अनेक घरे धोक्यात आली आहेत. सध्याच्या पावसाळी वातावरणात आणखी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या कुटुंबांच्या तातडीच्या आणि कायमस्वरूपी स्थलांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने आता केवळ मलमपट्टी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.