स्थानिक तरुण डॉक्टरांना आपल्या गाडीवरून आणून वैद्यकीय सेवेनंतर परत सोडणार
लांजा : रोजगारासाठी मुंबई व चेन्नईसारख्या शहरांत स्थायिक असलेल्या माचाळ गावातील तरुणांनी आपल्या गावातील आरोग्यसेवेची गरज ओळखून उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. त्यांच्या पुढाकारातून आता डॉ.साईनाथ तुरंबेकर हे प्रत्येक गुरुवारी पालू येथून माचाळ येथे येऊन वैद्यकीय सेवा देणार आहेत.
डॉ.तुरंबेकर हे दर गुरुवारी माचाळचे गावकार पांडुरंग पाटील यांच्या घरी संध्याकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करतील. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माचाळ येथील ग्रामस्थांना उपचारासाठी पालू व प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी याठिकाणी जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांना गावातच वैद्यकीय उपचार मिळावे या हेतूने हे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे.
या उपक्रमात शिपोशी गावचे शहानवाज सारंग उर्फ पिंट्या यांचा विशेष सहभाग असून, माचाळ परिसरात त्यांना ‘पर्यटक दूत’ म्हणूनही ओळखले जाते. डॉक्टर तुरंबेकर यांना माचाळ येथे आणणे आणि परत घेऊन जाण्याचे काम शहानवाज करत आहेत. माचाळमधील कोणतेही सामाजिक कार्य असो, शहानवाज नेहमी पुढे सरसावतात, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे
दरम्यान, गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद, तरुणांची सामाजिक जाण आणि डॉक्टरांची सेवा वृत्ती यामुळे माचाळमध्ये आरोग्याच्या दृष्टीने एक सकारात्मक बदल घडताना दिसत आहे.
या उपक्रमामुळे माचाळ ग्रामस्थांना त्यांच्या गावातच अद्यावत वैद्यकीय सेवा मिळणार आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचे असून ही सेवा सातत्याने सुरू रहावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी लक्ष घालावे, अशी मागणी माचाळ ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.