लांजा : येथील नगरपंचायतमधील नवनिर्वाचित नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी जनतेशी थेट संवाद साधत एक आगळावेगळा व कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. नगरपंचायत हद्दीतील विविध प्रभागांमध्ये कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या घंटागाडीत स्वतः स्वार होत त्यांनी प्रत्यक्ष परिसरात फिरून स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
घंटागाडी प्रभागांमधून फिरत असताना कचरा संकलन कशा पद्धतीने केले जाते, स्वच्छता कर्मचारी नागरिकांना कसे सहकार्य करतात आणि कचरा टाकताना नागरिकांना कोणत्या अडचणी येतात का, याबाबत त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत माहिती घेतली. यासोबतच कचरा संकलन प्रक्रियेत आणखी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत का, याबाबतही नागरिकांची मते त्यांनी जाणून घेतली.
प्रभाग क्रमांक २ मधून निवडून आलेले नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता इतर प्रभागांमध्येही भेटी देत नागरिकांशी चर्चा केली. सकाळी आठ वाजल्यापासून त्यांनी घंटागाडीसोबत फिरण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत काम करत नागरिकांना मदत केली आणि स्वतः कचरा घंटागाडीत टाकत सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून लोकप्रतिनिधी थेट मैदानात उतरून समस्या समजून घेत असल्याची भावना व्यक्त होत आहे. केवळ कार्यालयात बसून नव्हे तर प्रत्यक्ष कामात सहभागी होऊन जनतेच्या अडचणी जाणून घेणे किती आवश्यक आहे, याचे उत्तम उदाहरण पंढरीनाथ मायशेट्येंचा हा उपक्रम ठरत आहे.






