राजापूर : तालुक्यातील ओणी येथे हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. दीपक महादेव जाधव (वय ४५, रा. ओणी मार्केट, मूळ रा. तिवरे बौधवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना २४ जुलै २०२५ रोजी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक जाधव हे २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी परतले. ओणी येथील राहत्या घरी जेवण करून ते झोपी गेले. रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांच्या पत्नी आणि शेजाऱ्यांनी तात्काळ ओणी येथील साखळकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती जाधव यांना मृत घोषित केले.
साखळकर हॉस्पिटलमध्ये त्यांना २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६.२३ वाजता दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जाधव कुटुंबीयांवर आणि ओणी परिसरात शोककळा पसरली आहे.
राजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.