राजापूर : श्रावणातील पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून मंगळवारी श्री भक्त पुंडलिक मंदिर ते बाजारपेठेतील श्री विठ्ठल मंदिर दरम्यान वारकरी मंडळीनी पारंपरिक वेशात टाळ-मृदंगासह भक्तिमय दिंडी काढली. “विठू नामाचा गजर” करत निघालेल्या या दिंडीने संपूर्ण बाजारपेठ भक्तिरसात न्हाऊन निघाली.
पंढरपूर वारीला अनेक वारकरी मंडळी कार्तिकी एकादशीला हजेरी लावत असले तरी आषाढी व श्रावणातील वारी कोकणातच साजरी केली जाते. त्याचप्रमाणे राजापूरच्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी श्रावण एकादशीला वारी काढण्याचा संकल्प राबवला जातो. यंदा सलग दुसऱ्या वर्षी ही परंपरा जपली गेली.
दिंडीची सुरुवात भक्त पुंडलिक मंदिरापासून झाली. अर्जुना नदी स्नान व पूजेनंतर विठ्ठल मंदिर, बंदरधक्का, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, जवाहर चौक मार्गे बाजारपेठेत दिंडी फेरी झाली. जवाहर चौकात भक्तांनी रिंगण धरून भक्तीचा उत्सव रंगवला. शेवटी विठ्ठल मंदिरात भजन व हरिपाठाने दिंडीची सांगता झाली.
या दिंडीत ह.भ.प. दादा राजापकर, विठ्ठल चोरगे, अंकुश पावसकर, रविंद्र नागरेकर, राजेश सोडये, संदीप मालपेकर, राजन नवाळे, अनंत रानडे, विवेक गादीकर यांसह महिला-पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
विठू माऊलीच्या जयघोषाने राजापूर नगरी दुमदुमली
