चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कामथे गावातील हरेकरवाडी येथे शनिवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ६० हजार लिटर केमिकलमिश्रित पाणी थेट नदीत सोडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, दोन टँकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेतील तिन्ही टँकर चालक फरार झाले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण चिपळूण परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी रात्री साधारण ९ वाजताच्या सुमारास कामथे हरेकरवाडी येथील एका धाब्याजवळील नाल्याजवळ पाच टँकर रांगेत उभे होते. सुरुवातीला स्थानिक नागरिकांना वाटले की चालक आणि वाहक जेवणासाठी थांबले असावेत. मात्र, रात्री खेकडे पकडण्यासाठी नदीकाठी गेलेल्या काही तरुणांना धक्काच बसला. त्यांना तीन इंचाच्या पाईपद्वारे टँकरमधून केमिकलचे पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आले.
या सजग तरुणांनी तत्काळ ही माहिती चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती अनंत हरेकर यांना दिली. माहिती मिळताच हरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन टँकर अडवण्यात यश मिळवले. मात्र, ग्रामस्थांनी घेराव घालण्याचा प्रयत्न करताच, तीन रिकामे टँकर घटनास्थळावरून पसार झाले, तर भरलेल्या टँकरवरील चालकही पळून गेले.
अनंत हरेकर यांनी या प्रकाराची माहिती तात्काळ पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही टँकर ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.
पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती
हे केमिकलयुक्त पाणी शिवनदीमार्गे वाशिष्ठी नदीत मिसळत असल्याने, याचा थेट परिणाम चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या गावांच्या नळपाणी योजनांवर होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. पर्यावरणीय दृष्टीनेही ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या प्रदूषणामुळे नद्यांचे प्रदूषण, जलस्रोतांची अशुद्धता, तसेच मासेमारी आणि स्थानिक जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला असला तरी, फरार झालेल्या टँकर चालकांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. संबंधित टँकर कोणाच्या मालकीचे होते, त्यांनी हे केमिकल कुठून आणले आणि ते कुठे नेले जात होते, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.