चिपळूण : एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने वर्चस्व गाजवत विजय संपादन केला.
या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील चार संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात सावर्डे विद्यालयाने मेरी माता विद्यालयाच्या संघावर मात करत जिल्हास्तरावर आपले स्थान निश्चित केले. संघाच्या समृद्धी पास्टे हिने पहिल्या हाफमध्ये एक तर दुसऱ्या हाफमध्ये आणखी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
संघात आरती मकाळे, समीक्षा जसवाल, श्रेया जाधव, यशस्वी पवार, प्रिया पवार, प्रचिती भारती, जागृती ओकटे, अवंती नरळकर, आर्या गुजर, अमृता पिरधनकर, अनुष्का गोरीवले व स्वरूपा कुसळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
संघाला क्रीडा शिक्षक रोहित गमरे, अमृत कडगावे, प्रशांत सकपाळ व दादासाहेब पांढरे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, संस्थेचे सचिव महेश महाडिक ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे पदाधिकारी, सावर्डे परिसरातील पालक क्रीडाप्रेमी,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सावर्डे विद्यालयाची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड तालुकास्तरीय स्पर्धेत मैदानी वर्चस्व; समृद्धी पास्टेची दुहेरी कामगिरी
