लांजा : तालुक्यातील मिरजोळकरवाडी येथील तुकाराम केशव मिरजोळकर (वय ५८) यांचा पेंटिंगचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. २ जुलै रोजी दुपारी ४.०० वाजता कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे मिरजोळकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम मिरजोळकर हे २८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता लांजा येथील गोंडे सखल रोड येथे पेंटिंगचे काम करत होते. त्याचवेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का लागला. या घटनेनंतर त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याच दिवशी २८ मे रोजी रात्री ९.१५ वाजता त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असताना त्यांची झुंज अपयशी ठरली आणि २ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लांजात पेंटिंग करताना विजेचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू
