संगमेश्वर: साखरपा येथील सुपुत्र, दुर्गप्रेमी निखिल जामसंडेकर यांनी ३०० किल्ल्यांची सफर पूर्ण करत एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांवरील प्रेमातून त्यांनी हे अविश्वसनीय उद्दिष्ट साध्य केले आहे.
रत्नागिरी येथील पोस्ट ऑफिसमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत असलेले निखिल, २०१५ पासून दुर्गभ्रमंती करत आहेत. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षापासून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील अनेक आव्हानात्मक किल्ले सर केले आहेत, ज्यात कलावंतीण दुर्ग, कळसुबाई, साल्हेर आणि सालोटा यांचा समावेश आहे. याशिवाय, संगमेश्वर तालुक्यातील धोकादायक समजले जाणारे प्रचितगड, मुगगड, विजापूर यांसारखे किल्लेही त्यांनी यशस्वीरित्या पार केले आहेत.
इतिहासाची सखोल आवड असल्याने, निखिल सतत दुर्गविषयक पुस्तकांचा अभ्यास करतात. बी.ए. पदवीधर असलेले निखिल केवळ किल्ले पाहण्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते मित्रमंडळींच्या मदतीने गडसंवर्धनाचे कार्यही करतात. किल्ल्यांवर स्वच्छता राखणे, ऐतिहासिक माहिती देणे आणि त्यांचे जतन करणे यासाठी ते विशेष प्रयत्न करतात. या प्रवासात त्यांचे मित्र प्रणव मापुस्कर, प्रशांत वैद्य, नरेंद्र जाधव आणि भाई गांधी यांनी त्यांना मोलाची साथ दिली आहे.
“छत्रपतींचा इतिहास आणि गड-किल्ले हे आपलं वैभव आहे, त्यांना प्रत्यक्ष अनुभवणं आणि जपणं हे आपलं कर्तव्य आहे,” असे मत निखिल जामसंडेकर यांनी व्यक्त केले. तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या निखिलला रत्नागिरी जिल्ह्यातून आणि सोशल मीडियावरुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्व किल्ले सर करण्याचा त्यांचा निर्धार आहे.