राजापूर : राजापूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय सध्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेत आले आहे. कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेतकरी व नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. मात्र एवढं करूनही त्यांचे काम पूर्ण होत नाही. या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र संतापाचे वातावरण आहे.
या कार्यालयात अनेकदा फक्त एखादा कर्मचारी हजर असतो. बाकीचे टेबल रिकामे असून, कार्यालय शोभेचे बाहुले बनले आहे. उपस्थित कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता “सर्वजण मोजणीला गेले आहेत”, “बाहेर गेले आहेत” अशी उत्तरं मिळतात. काही कर्मचारी चहा पिण्याच्या निमित्ताने सतत बाहेर फिरताना दिसतात, पण प्रत्यक्षात कार्यालयात नियमितपणे काम करणारा कर्मचारी दिसून येत नाही.
नागरिकांच्या मते, कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची केबिन कायम रिकामी असते. सहा-सहा महिने उंबरठा झिजवूनही लोकांना जमिनीचे नकाशे किंवा अन्य कागदपत्र मिळत नाहीत. उपस्थित कर्मचारी जनतेला बोळवण करत असल्याच्या तक्रारी वारंवार ऐकायला मिळतात. या उलट, काही कर्मचाऱ्यांचे जमिनीत रस असणाऱ्या दलालांशीच जास्त साटेलोटे असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होतो आहे.
या कार्यालयात एकूण किती पदे मंजूर आहेत आणि त्यापैकी किती रिक्त आहेत, याची अधिकृत माहिती मिळत नाही. कार्यालयात हालचाल रजिस्टर सुद्धा नसल्याचे निदर्शनास येते. विचारणा केली असता, तो रजिस्टर अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये असल्याचे उत्तर मिळते. या सर्व प्रकारामुळे ‘या कार्यालयाचा वाली तरी कोण आहे?’ असा सवाल सामान्य नागरिक थेट विचारू लागले आहेत.
कार्यालयाच्या या बेफिकीर कारभारामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्याच्या प्रत्येक टोकातून आलेले नागरिक वारंवार अपमानित होत असून, त्यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजापूर तालुका भूमी अभिलेख कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी उपयोगी न ठरता केवळ देखाव्यापुरतेच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राजापूर भूमी अभिलेखमधील अधिकारी-कर्मचारी बेपत्ता, नागरिकांना माराव्या लागताहेत चकरा
