रत्नागिरी/ समीर शिगवण: जयगड-निवळी मार्गावरील ओरी मधलीवाडी येथील वळणावर कोळसा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला शुक्रवारी रात्री अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात ट्रकचा चालक बचावला. मात्र, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयगडहून कर्नाटकला कोळसा घेऊन जाणारा (के ए 48 ए 1401) क्रमांकाचा ट्रक ओरी मधलीवाडी येथील धोकादायक वळणातून जात होता. त्याचवेळी समोरून अचानक एक वाहन आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या आधीही अनेक वेळा ट्रक बंद पडण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात जवळपास ५ टन कोळसा ट्रकमध्ये होता, तो दुसऱ्या ट्रकमधून पुढे पाठवण्यात आला. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती. मात्र, कोणतीही जीवितहानी न झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.