GRAMIN SEARCH BANNER

पावस कुर्धे जिनेन्द्र नगर परिसरात वनव्यात गोदाम जळून खाक, २६ लाखांचे नुकसान

Gramin Varta
223 Views

पावस : तालुक्यातील कुर्धे जिनेन्द्र नगर परिसरातील कातळ भागात उगवलेल्या गवताला लागलेल्या वनव्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीने पावस–पूर्णगड मार्गालगत असलेल्या सौ. निकिता राजेंद्र रसाळ यांच्या गोदामाला घेरले. रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दल आणि फिनोलेक्स कंपनीचा अग्निशमन बंब आणि जवान यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 3 तास लागले. मात्र तोपर्यंत गोडाऊन पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेत 26 लाख 17 हजारांचे नुकसान झाल्याचे मेर्वी तलाठी मीनाक्षी कदम यांनी सांगितले.

कुर्धे परिसरातील कातळ भागात असलामुळे दरवर्षी वनव्याचा धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी कातळ परिसरातील गवताला आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे ही आग वेगाने पसरत गेली आणि सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास या वनव्याने थेट गोदाम परिसरात प्रवेश केला.

गोदामात सौ. निकिता रसाळ यांचे पावस शहरातील दुकान चालवण्यासाठी राखून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील इलेक्ट्रिक साहित्य, रंगांचे डबे, ताडपत्री, पाण्याच्या टाक्या तसेच विविध प्रकारच्या प्लास्टिक वस्तू साठवून ठेवण्यात आल्या होत्या. अचानक लागलेल्या वनव्यामुळे या सर्व साहित्याला मोठ्या प्रमाणात फटका बसून संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी गेले.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपरिषद तसेच फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाने मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करत तब्बल दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरवर्षी कातळ भागातील गवतामुळे निर्माण होणाऱ्या वनव्याच्या पार्श्वभूमीवर अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.

Total Visitor Counter

3376134
Share This Article