GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : विनापरवाना अर्जुना कालव्याचे गेट बंद केल्याने जलसंपदा विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान; एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
165 Views

राजापूर:तालुक्यातील पाचल येथील अर्जुना साखळी उजव्या कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्यामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन फुटल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे जलसंपदा विभागाचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पाचल धनगरवाडीकडे जाणारा १०० मीटर लांबीचा डांबरी रस्ताही वाहून गेला आहे. या प्रकरणी लांजा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल एकनाथ बनसोडे (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुभाष काळे (वय ४५, रा. पाचल) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास अर्जुना साखळी उजव्या कालव्याच्या साखळी क्रमांक १३६०० ते १४३३० मीटर दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुभाष काळे याने कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय कालव्याचे गेट बंद केले. यामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह रोखला जाऊन पाणी ओव्हरफ्लो झाले आणि साधारण ३० मीटर लांबीचा कालव्याचा भरावाचा भाग फुटला. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे कालव्याच्या खालील भागातील पाचल धनगरवाडीकडे जाणारा डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून वाहून गेला, तसेच परिसरातील शेतजमिनींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार, कालवा फुटल्यामुळे शासनाचे ७ ते ८ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी अमोल बनसोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ९ मार्च रोजी रात्री २०:१८ वाजता गु.आर.नं. ५६/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. संशयित आरोपीवर भारतीय न्यायसंहिता तसेच सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3324749
Share This Article